देशात काल दिवसभरात तब्बल ८१ हजार ४६६ रुग्णांची नोंद


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशात पुन्हा एकदा वाढू लागला असून देशात काल दिवसभरात तब्बल ८१ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १३ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यातील एका दिवसात नोंद होणारी ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. याआधी ११ ऑक्टोबरला ७४ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान काल दिवसभरात ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ एवढी झाली आहे. तर १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ६ लाख १४ हजार ६९६ अॅक्टिव्ह केसेस असून मृतांच्या संख्या १ लाख ६३ हजार ३९६ एवढी झाली आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र कोरोना रुग्णवाढीत आघाडीवर असून लवकरच ठाकरे सरकाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आरटी-पीसीआर टेस्टचा दर १००० वरुन ५०० वर आणला आहे.