नटराजनला आनंद महिंद्रांनी गिफ्ट केली Thar SUV


देशातील प्रत्येक घडामोडी व्यक्त होणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपले वचन पूर्ण केले आहे. अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू जायबंदी असताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित पराभवाचे पाणी पाजणाऱ्या टीम इंडियातील सहा तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा भलतेच खूश झाले होते आणि या तरुण खेळाडूंना एक शानदार गिफ्ट देण्याची घोषणा त्यांनी केली होती.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच गिफ्ट म्हणून देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आता टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज टी.नटराजन याला THAR SUV गिफ्ट केली आहे. नटराजनला काल (दि.१) ही दमदार एसयूव्ही मिळाली.

गाबा कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुबमन गिल, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना महिंद्रा थार गिफ्ट करण्याची घोषणा केली होती, काल ही थार एसयूव्ही नटराजनला मिळाली. याबाबतची माहिती नटराजनने ट्विट करुन दिली. महिंद्रांनी थार गिफ्ट करण्याची घोषणा केल्यानंतर नटराजनच्या आधी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यानेही प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी महिंद्रांनी एवढे ढासू गिफ्ट जाहीर केल्याने मराठमोळा शार्दुल ठाकूरही भलताच खूश झाला होता.

धन्यवाद सर… माझ्या कामगिरीची तुम्ही दखल घेणे हिच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे….तुमच्याकडून आलेले गिफ्ट सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे….तुम्ही जसे म्हणता त्याप्रमाणे अशक्य गोष्टी धुंडाळल्या पाहिजेत. तुम्ही दिलेल्या या गिफ्टसाठी मी आभारी असल्याचे म्हणत शार्दुलने महिंद्रांचे आभार मानले होते.

भारतातील भविष्यातील तरुण पिढ्यांसाठी स्वप्न पाहण्याची आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवण्याची प्रेरणा तरुण खेळाडूंनी दिली आहे. त्यांचे मनोबल वाढावे म्हणून थार एसयूव्ही गिफ्ट केल्याचे महिंद्रांनी ट्विटरद्वारे सांगितले होते. त्यावर महिंद्रांकडून थार भेटल्यानंतर नटराजनने ट्विटरद्वारे चांगल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अशक्यप्राय गोष्टी करणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


माझ्यासाठी भारतासाठी क्रिकेट खेळणे जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. माझा हा प्रवास खूप वेगळा होता. या प्रवासात मला जे प्रेम आणि आपलेपण मिळाले ते पाहून मी भारावून गेलो आहे. चांगल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे अशक्यप्राय गोष्टी करणे शक्य झाल्याचे ट्विटरद्वारे नटराजनने सांगितले.


आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने, आज महिंद्रा थार चालवत मी घरी पोहोचलो आहे. आनंद महिंद्रांचे आभार मानतो, ज्यांनी माझा प्रवास ओळखला आणि प्रोत्साहन दिले. क्रिकेटवरील तुमचे प्रेम बघून मला विश्वास आहे की माझी गाबा कसोटीतील ही स्वाक्षरीकृत जर्सी तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटेल, असे म्हणत गाबा कसोटीत त्याने घातलेली जर्सी स्वतःची स्वाक्षरी करत नटराजनने महिंद्रांना भेट म्हणून पाठवली. सोबत ही जर्सी तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटेल असा खास संदेशही दिला. ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यातूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नटराजनने पदार्पण केले. या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते.