वाझे सोबत दिसलेल्या महिलेला एनआयने केली अटक

अँटिलिया केस मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजे एनआयएला मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीसातून निलंबित केल्या गेलेल्या सचिन वाझे यांच्यासोबत पंचतारांकित हॉटेल मध्ये काही बॅगा घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या रहस्यमयी महिलेला एनआयने ताब्यात घेऊन तिची काही तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर तिला अटक केली गेल्याचे समजते.

१६ फेब्रुवारी रोजी सचिन वाझेसह ही महिला द.मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसली होती. तिच्या हातात एक बॅग दिसत होती. एनआयएने या हॉटेलची आणि क्लबची गुरुवारी तपासणी केली आणि ठाणे येथील एका फ्लॅटचाही तपास केला तेव्हा ही महिला एनआयएच्या हाती लागली असे समजते. वाझे यांच्या कार मध्ये पाच मोठ्या बॅगा तपासात सापडल्या होत्या. ही महिला काळा पैसा पांढरा करून देण्याचे काम वाझे साठी करत होती आणि त्यासाठी दोन आयडींचा वापर करत होती असे उघड झाले असून तपासात सापडलेली नोटा मोजायची यंत्रे याच महिलेची असल्याचे सांगितले जात आहे.