भारताची लस मिळाली नाही तर आफ्रिका विनाशाच्या मार्गावर

आफ्रिकन देशात करोनाचा प्रसार अति वेगाने होत असून स्थानिक सरकार हतबल बनले आहे. करोना लसीकरणासाठी भारताकडे आफ्रिकेचे लक्ष लागले असून ही लस मिळाली नाही तर आफ्रिका विनाशाच्या मार्गावर पोहोचेल असे सांगितले जात आहे. भारताने स्थानिक मागणी पुरी करता यावी यासाठी सिरमच्या लसीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आफ्रिकन आरोग्य संघटनेचे अधिकारी म्हणतात भारताने ही बंदी लवकर उठविली नाही तर अॅस्ट्राजेनेका लसीवर जे गरीब देश आशा लावून बसले आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे.

आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे प्रमुख जॉन नेकेंगसॉंग इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा मध्ये संमेलनात बोलताना म्हणाले, भारताने सिरम लस निर्यातीवर बंदी घातल्याने देशातील लसीकरण कार्यक्रमावर प्रभाव पडणार आहे. या वर्षाखेर २० ते ३० नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना आखली होती पण भारताने निर्यातीवर बंदी घातल्याने हे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. परिणामी आफ्रिकेतील परिस्थिती अधिक विनाशकारी बनणार आहे.

आफ्रिकेत आत्तापर्यंत ४२ लाख लोकांना करोना संक्रमण झाले असून १.१२ लाख मृत्यू झाले आहेत. हा आकडा आणखी जास्त असू शकेल. आफ्रिका ज्या ज्या देशात लस तयार होते आहे तेथून लस मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने आफ्रिकी देशांना ४० कोटी डोस देण्याचे मान्य केले असले तरी ही लस या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपासून २०२२ पर्यंतच्या काळात पुरवली जाणार आहे.