खासदार किरण खेर रक्ताच्या कर्करोगाने आजारी

बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपच्या चंदिगड खासदार किरण खेर याना रक्ताचा कर्करोग झाला असून त्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे पती अनुपम खेर यांनी त्यासंदर्भातील बातमीला पुष्टी दिली आहे. चंदिगडच्या भाजप खासदार किरण खेर मतदारसंघात दिसलेल्या नाहीत म्हणून त्यांच्या शोधाची मोहीम कॉंग्रेसने हाती घेतली होती. मंगळवारी आमदार सतीश यांनी बागा, मंदिरे, झाडांमध्ये दिवसा मेणबत्ती घेऊन खेर यांचा शोध घेतला तर अन्य एका आमदाराने दुर्बिणीतून खेर यांचा शोध घेतला. या प्रकारानंतर चंदिगड भाजपचे अध्यक्ष अरुण सूद यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन किरण खेर यांच्या आजाराची माहिती दिली.

सूद म्हणाले ६८ वर्षीय किरण याना गेल्या वर्षी मल्टीपल मायलोमा आजार झाला असून हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. अनुपम खेर यांनी किरण यांच्याबाबतीत काही अफवा पसरू नयेत म्हणून माहिती शेअर करत असल्याचे सांगून म्हटले आहे, किरण यांना रक्ताचा कर्करोग झाला आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. किरण फायटर आहे, या रोगाला मात देऊन ती पुन्हा पहिल्या तडफेने कामाची सुरवात करेल. तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद हवेत.

किरण आणि अनुपम खेर यांनी ८५ साली विवाह केला आहे. किरण यांचा पहिल्या विवाहातून झालेला सिकंदर या मुलाला अनुपम यांनी स्वतःचे नाव दिले आहे. किरण यांचा डावा हात ११ नोव्हेंबर रोजी फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी केलेल्या अन्य तपासण्यात त्यांना कॅन्सर असल्याचे लक्षात आले. ४ डिसेंबर पासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. मल्टीपल मायलोमा वर काही वर्षांपूर्वी उपचार नव्हते मात्र आता या रोगावर उपचार आहेत.