करोना काळात सुद्धा करू शकता या सात देशांची सफर

गेल्या वर्षी आणि या वर्षात सुद्धा सुट्यांच्या काळात करोनाने लोकांना घरातच बसणे भाग पाडले असले तरी या काळात सुद्धा सात देशात पर्यटन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक देशांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. भारतात तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांना सुद्धा अनेक नियम पाळावे लागत आहेत. मात्र काही देशांनी पर्यटकांना त्यांच्या देशात काही अटींवर येण्याची परवानगी दिली आहे.

नेपाळ हा भारताचा शेजारी देश. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि जगभरातून पर्यटक येथे नेहमीच येत असतात. भारतीय लोकांना नेपाळ ला जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. अनेक धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे यांनी हा देश समृध्द आहे. येथे जायचे असेल तर कोविड १९ पीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून प्रवेश करता येणार आहे.

जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे मालदीव. सर्वसामान्य जनता ते फिल्मी सेलेब्रिटी मालदीवला जाणे पसंत करतात. सुंदर बीचच्या नुसत्या दर्शनाने शरीराचा सारा थकवा येथे दूर होतो. येथेही कोविड १९ पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखविल्यावर पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. उन्हाळ्याने त्रासलेल्या भारतीयांना थंड युक्रेनची भेट नक्कीच आवडेल. येथील स्ट्रीट फूड खुपच प्रसिध्द आहे. शिवाय बीच, हिलटॉप हवेल्या आहेतच. येथे जाणाऱ्यांना येथील विमा कंपनीकडून विमा पॉलिसी घ्यावी लागेल आणि त्यानंतर देशात प्रवेश मिळेल.

दरवर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक भेट देतात त्या युएई मध्ये सुद्धा पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी कोविड पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. थायलंड हा पर्यटकांचा आणखी एक आवडता देश. स्वस्त शॉपिंग, सुंदर समुद्र किनारे येथे तुमचा सारा शीण नक्कीच घालवतील. येथे जायचे असेल तर फिट टू फ्लाय हेल्थ सर्टिफिकेट, मेडिकल विमा आणि कोविड १९ पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट हवा.

रशिया हाही पर्यटकांचे आकर्षण असलेला देश. प्रचंड थंडी ही येथली खासियत. या देशात काही काळापूर्वी पर्यटकांवर बंदी होती. पण भारतीय या देशात जाऊ शकतात. त्यांना ७२ तासातले कोविड निगेटिव्ह रिपोर्ट त्यासाठी दाखवावे लागणार आहेत.

साहसी पर्यटन, शांती, ऐतिहासिक पर्यटन यांची आवड असलेले भटके श्रीलंकेत जाण्याचा विचार नक्कीच करू शकतात. त्यासाठी हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरून कोविड १९ पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.