तामिळनाडूतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रजनीकांत यांना दिला का पुरस्कार? या प्रश्नावर भडकले जावडेकर


नवी दिल्ली – सिनेसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा असा ओळखला जाणार दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. पण तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीशी या पुरस्काराचा संबंध जोडला जात आहे. पत्रकार परिषदेत अशीच शंका उपस्थित करण्यात आली होती. प्रकाश जावडेकर यांना त्यावरून संताप अनावर झाला. त्यांनी या प्रश्नावरून लागलीच प्रश्न विचारणाऱ्याला सुनावले.

दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान केला जातो. हा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. याची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांना रजनीकांत यांना जाहीर झालेला पुरस्कार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणूक यावरून प्रश्न विचारण्यात आला. रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्कार तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे दिला जात आहे का?,’ असा प्रश्न विचारण्यात आला.

प्रकाश जावडेकर या प्रश्नामुळे चांगलेच संतापले. त्यांनी लागलीच त्या प्रश्नाला उत्तरही दिले. जावडेकर म्हणाले, सिनेसृष्टीशी संबंधित हा पुरस्कार आहे. रजनीकांत यांच्या नावाची या पुरस्कारासाठी पाच जणांच्या निवड समितीने एकमताने निवड केली आहे. यात राजकारण कोठून आले? प्रश्न विचारताना नीट विचारले पाहिजेत, असे जावडेकर यांनी सुनावले. पुढे बोलताना जावडेकर म्हणाले, मागील पाच दशकांपासून रजनीकांत हे सिनेसृष्टीत आहेत. लोकांचे मनोरंजन करत आहेत. चित्रपटसृष्टी गाजवत असल्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पाच सदस्यीय निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतलेला आहे.