रवी शास्त्री यांनी का बरं घेतली भगतसिंह कोश्यारी यांची भेट?


मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी बुधवारी भेट घेतली. ही भेट मुंबईत राजभवनावर झाली. भेटीत कोश्यारी आणि रवी शास्त्री यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. भारतीय संघाने नुकताच इंग्लंड संघाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये पराभव केला आहे. त्यानंतर रवी शास्त्री यांनी कोश्यारी यांची भेट घेतली आहे. रवी शास्त्री यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली आहे. तसेच कोश्यारी आणि शास्त्री यांच्या भेटीचा फोटोही ट्विट केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दरम्यान सध्या बऱ्याच जणांना रवी शास्त्री यांनी कोश्यारी यांची भेट का घेतली असावी, असा प्रश्न पडला आहे. मात्र ही भेट कोणत्याही कारणास्तव झाली नसून सदिच्छा भेट असल्याचे राज्यपाल कार्यालयाने सांगितलं आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गरमागरमी सुरु आहे. राज्यपालांच्या भेटीसाठी अनेक नेतेमंडळी सारखे राजभवनावर जात असतात. राज्यपालही त्यांना भेटत असतात. पण भरपूर दिवसांनंतर क्रीडा विश्वातील कुणीतरी राज्यपालांना भेटले, म्हणून रवी शास्त्री यांच्या राज्यपाल भेटीची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे.

रवी शास्त्री भारतीय संघाचे अनेक नेतेमंडळी मुख्य प्रशिक्षक असल्याने ते आयपीएलमध्ये कोणतीही भूमिका वठवू शकत नाही वा भाग घेऊ शकत नाही. पुढचे 50 ते 60 दिवस भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल खेळणार आहेत. त्यामुळे रवी शास्त्री यांच्याकडे आता जवळपास दोन महिन्यांचा वेळ असणार आहे. त्याअगोदर त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आहे.