पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमधील एसी बंद पडल्याने झाले हाल


पुणे – राज्यातील विविध शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या मुंबई, पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही वाढत असल्यामुळे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. पण कोविड सेंटरमधील भोंगळ कारभार पहिल्याच दिवशी समोर आला. रुग्णांसह डॉक्टरांचे कोविड सेंटरमधील एसी बंद पडल्यामुळे हाल झाले. याप्रकरणी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला असून, बैठकीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. एकूण शंभर रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पण एसी बंद झाल्याने त्यांना घामाच्या धारा लागल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी १ एप्रिलपासून शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार, कोविड सेंटरमध्ये साफसफाई करण्यात आली. कोविड सेंटरमध्ये आज शंभर रुग्णांना दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी रुग्णांचे हाल झाले. वाढलेल्या उन्हाच्या पाऱ्यात कोविड सेंटरमधील एसी बंद पडल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांसह डॉक्टरांना घामाच्या धारा लागल्या. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा रुग्णांना बसला आहे. यावर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटरमधील एसी सुरू होण्यास किती वेळ लागेल, याचीही माहिती दिली जात नाही.

सध्या २०० बेडची व्यवस्था ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूसह सज्ज अससेल्या या जम्बो कोविड सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे. हे जम्बो कोविड केअर सेंटर १ सप्टेंबर २०२० रोजी रुग्णांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आले होते. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे १ जानेवारीपासून जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते, ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पण, पहिल्याच दिवशी रुग्ण व डॉक्टरांना त्रासाला सामोरे जावे लागले.