कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस धेतल्यानंतर महापौर मोहोळ यांचे पुणेकरांना आवाहन


पुणे – आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण केंद्र सरकारने खुले केले आहे. दरम्यान, लसीकरण केंद्रावर जाऊन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पहिला डोस घेतला. तसेच यावेळी त्यांनी पुणेकरांनाही आवाहन केले.

केंद्राने केलेल्या घोषणेनुसार आजपासून देशभरात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाली. आतापर्यंत कोरोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती तसेच ६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होते. नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात झाली असून, कोथरुड येथील महापालिकेच्या सुतार दवाखाना येथे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लस घेतली.

महापौर मोहोळ त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, कोरोनाचे रुग्ण पुणे शहरात वर्षभरात मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. त्याकाळात ही साथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आपण विविध उपाययोजना केल्या. वर्षभरात नागरिक लस केव्हा येणार या प्रतिक्षेत होते. अखेर आपल्या सर्वांना लस उपलब्ध झाली असून, नागरिक लस घेत आहे. पण अनेक नागरिकांमध्ये गैरसमज पाहण्यास मिळत आहे. नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

महापौर पुढे बोलताना म्हणाले, पुणे शहरात ११४ केंद्र सुरू असून, दररोज साधारण १५ हजार नागरिकांना लस दिली जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन लाख ६० हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर ४५ वर्षांपुढील साधारण १५ लाख लोकसंख्या असल्यामुळे या सर्वांना लस दिली जाणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शहरात मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.