आजपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद!


ठाणे – कोराना महामारीने पुन्हा एकदा गंभीर रुप धारण करू लागला असून राज्यातील काही भागांमध्ये कठोर निर्बंध लादले जात असताना दुसरीकडे राज्य सरकार संपूर्ण राज्यातच कठोर नियम घालण्याच्या तयारीत आहे. कोरोनाचे रुग्ण ठाण्यामध्ये देखील वाढू लागल्यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी ८ वाजेनंतर लॉकडाऊन लागू केला आहे. पण आता त्याविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. संध्याकाळी ८ वाजेनंतर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि एक्साईज फीची रक्कम भरण्यासाठीचे हफ्ते यासंदर्भात या संघटनांनी भूमिका घेतली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आजपासून कुठेही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री केली जाणार नसल्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.

ही मद्यविक्री ठाणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा सर्वच ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बंद ठेवली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्या सर्व महानगरपालिका क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला भरावी लागणारी एक्साईज फी हफ्त्यांमध्ये भरण्याची मुभा द्यावी आणि संध्याकाळी ८ नंतर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रामुख्याने या व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल, असे देखील या व्यावसायिक संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोरोबाधितांचा आकडा सुमारे ३ लाखांच्या जवळ गेला असून मृतांचा आकडा देखील आत्तापर्यंत ५ हजारांच्या वर गेला असल्यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊन अंतर्गत कठोर निर्बंध लागू करावे लागले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये व्यावसायिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.