मुख्यमंत्र्यांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य DMK नेते ए. राजा यांना भोवले


चेन्नई – अवघे काही दिवस तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शिल्लक राहिलेले असतानाच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावर करण्यात आली आहे. द्रमुकच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून ए. राजा यांना वगळण्यात आले आहे. तसेच, दोन दिवस प्रचाराबंदी त्यांच्यावर घालण्यात आली आहे. द्रमुकला निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलला मतदान होत असून दोन दिवस आधी आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे २ दिवसांची प्रचारबंदी पाहाता ए. राजा यांना फक्त दोनच दिवस प्रचार करता येईल, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्याविषयी द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK चे स्टार प्रचारक ए राजा यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. १ वर्ष स्टॅलिन यांनी तुरुंगात काढले आहे. ते जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. जनरल कौन्सिलचे सदस्य राहिले आहेत. युवा संघटनेचे अध्यक्ष, नंतर पक्षाचे खजिनदार, पुढे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे असे म्हणता येईल की स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे. पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल असल्याचे राजा म्हणाले होते.

सत्ताधाऱ्यांनी ए. राजा यांच्या या वक्तव्यावरून जोरदार आगपाखड केली. ए. राजा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी देखील मागितली होती. राजा यांच्याविरोधात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या उत्तरादाखल ए. राजा यांच्याकडून देण्यात आलेल्या खुलाशाने आयोगाचे समाधान न झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.