देशभरात काल दिवसभरात ७२ हजार कोरोनाबाधितांची भर, तर ४५९ जणांनी गमावले प्राण


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट सध्या अजूनच गंभीर होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असून, गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीने रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचे दिसून आले. काल दिवसभरात देशात ७२ हजार ३३० नवीन कोरोनाबाधित आले आहेत. तर देशात साडेचारशेपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे. कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये झाला असून, प्रचंड वेगाने लोकांना लागण होत असल्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ७२ हजार ३३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० हजार ३८२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. काळजीची बाब म्हणजे मृत्यूची संख्याही वाढली आहे. याच कालावधीत देशात ४५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाला वेग दिला आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे, तिथे लसीकरण वेगाने करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. देशात आतापर्यंत ६,५१,१७,८९६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, देशात सध्या पाच लाख ८४ हजार ५५ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६२ हजार ९२७ जणांचा मृत्यू झाला आहे.