फर्स्ट डॉग ‘मेजर’ मुळे व्हाईट हाउस कर्मचारी हैराण

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाउस मध्ये येताना त्यांची दोन कुत्री बरोबर घेऊन आले आहेत. त्यातील जर्मन शेफर्ड कुत्रा, मेजर मुळे व्हाईट हाउस मधील कर्मचारी हैराण झाले आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यापासून मेजर ने दोन जणांना चावे घेतले आहेत. गेल्या आठवड्यात एका सुरक्षा रक्षकाला मेजर चावला होता तर नुकताच एका अन्य व्यक्तीचा त्याने चावा घेतला आहे. मिडिया मध्ये बायडेन यांचा मेजर चर्चेचा विषय झाला असून सोशल मीडियावर त्याचा उल्लेख ‘फर्स्ट डॉग’ असा केला जात आहे.

व्हाईट हाउसचे प्रेस सचिव मिशेल ला सोया या संदर्भात म्हणाले मेजर चालता चालताच एका व्यक्तीला चावला. या व्यक्तीवर त्वरित औषधोपचार केले गेले असून त्यांना फारशी मोठी जखम झालेली नाही. ही घटना घडली तेव्हा बायडेन आणि फर्स्ट लेडी व्हिएतनाम व्हेटरन मेमोरियल मध्ये गेले होते. मेजर नुकताच व्हाईट हाउस मध्ये आला आहे आणि अनेक नवीन माणसे त्याच्याभोवती आहेत. त्याला रुळायला थोडा वेळ लागेल.

मेजर हा बायडेन यांनी रेस्क्यू केलेला कुत्रा आहे. कुत्रांविषयी आपले प्रेम बायडेन यांनी अगोदरच जाहीर केले आहे. मेजर ३ वर्षाचा आहे तर दुसरा कुत्रा चँप १२ वर्षाचा आहे. व्हाईट हाउस मधील फर्निचर सोडून कुठेही बसण्याची या कुत्र्यांना परवानगी आहे. नोव्हेंबर मध्ये कुत्र्यांबरोबर खेळताना बायडेन जखमी झाले होते.