‘मिसेस गॅलेक्सी’ साठी भारताचे प्रतिनिधित्व करणार विंग कमांडर श्रुती

गेली १६ वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावणारी विंग कमांडर श्रुती चौहान आता ऑगस्ट मध्ये शिकागो येथे होत असलेल्या ‘मिसेस गॅलेक्सी’ सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्रुती जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या मिसेस इंडिया आयएनसी वर्ल्ड ब्युटी पेजेंट २०२१ ची द्वितीय रनर अप आहे. या स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहेत.

३८ वर्षीय श्रुतीसाठी ही कामगिरी सोपी नव्हती. घरात मुले, अन्य जबाबदाऱ्या, नोकरीतील कामावर परिणाम होऊ न देता स्पर्धेत भाग घेण्याची तिची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यासाठी घरातील सदस्यांचे तसेच हवाई दलाचे मोठे समर्थन मिळाले असे ती सांगते. वास्तविक मिस इंडिया स्पर्धा गेल्या जून मध्ये होणार होती पण करोना मुळे ती जानेवारी २०२१ मध्ये झाली.

या स्पर्धेसाठी श्रुतीला दोन आठवडे ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावे लागले. एक वर्षापूर्वी रँप वॉक करण्याची सवय करावी लागली. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक असलेली श्रुती सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहे. सेक्स वर्कर्सच्या मुलांना समाजात मानाने जगता यावे यासाठी ती काम करते. तसेच सीमेवर अथवा युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची मदत करण्यात पुढाकार घेते.