देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही – कमाल खान


काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वारंवार टीका करीत आहेत. यानंतर आता राष्ट्रीय स्वयसेवक संघावर बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही निशाणा साधला आहे. देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही बनले असल्याचा आरोप या अभिनेत्याने केला आहे.

एक ट्विट करत बॉलीवूडचा स्वयंघोषित समिक्षक अभिनेता कमाल खानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. कमाल खानच्या ट्विटवर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राहुल गांधी यांनीही काही दिवसांपूर्वी संघाला यापुढे संघ परिवार म्हणणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर आता मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्याने संघावर भाष्य केले आहे.


मी अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो की, नेमके काय खरे आहे आणि काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे? पण याचे उत्तर मला मिळत नाही. आपण ब्रिटिशांच्या अंमलाखाली होतो, हे प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नकार दिला. संघावर सरदार पटेल यांनीही बंदी आणली होती. पण, आज केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले तेवढे देशभक्त म्हणवून घेत आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही ठरत असल्याचे ट्विट कमाल खानने केले आहे.