पाकिस्तान; सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 जणांना एकाच तुरुंगात डांबले


इस्लामाबाद – संपूर्ण जगात कोरोना प्रादुर्भाव वेगाने होत आहे. लोकांच्या मनात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा कहर पाकिस्तानमध्ये देखील पाहायला मिळत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस इम्रान खान यांनी टोचून घेतली होती. त्यानंतरही आता त्यांना कोरोनाची लागण झाली. याच दरम्यान आता एक अजब घटना समोर आली आहे.

जवळपास 20 जणांना पाकिस्तानमधील फालिया शहरातून कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना एकाच तुरुंगात डांबण्यात आले. विशेष म्हणजे या सर्वांवर ही कारवाई सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आली होती. या सर्वांना जेलमध्ये डांबून ठेवल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी पाकिस्तानी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची खिल्ली उडवली आहे. सोशल डिस्टंसिंगचा नियम तोडला या आरोपाखाली सर्वांना अटक करण्यात आली, पण सर्व आरोपींना एकाच जेलमध्ये डांबून पोलीस कशाप्रकारे नियम पाळत असल्याचा सवाल लोकांनी विचारला आहे.


याबाबत पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने एक ट्विट केले आहे. कोरोनाने पाकिस्तानमध्ये थैमान घातले आहे. पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश पाकिस्तानी नागरिकांनाही लागू असणार आहे. प्रवेश बंदी केलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, रवांडा आणि टांझानियासह 12 देशांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये कोरोनाचा दक्षिण आफ्रिका स्ट्रेन आढळून आला होता. कोरोनाचे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे स्ट्रेन पाकिस्तानमध्ये आढळल्यानंतर नागरी विमान प्राधिकरणाने देशांची सूची जारी केली असून ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. सी गटातील 12 देशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 23 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत या 12 देशांवर प्रवास बंदी असणार आहे.