एनआयएची न्यायालयात माहिती; सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला होते हजर


मुंबई – सध्या एनआयएकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळून आलेली स्फोटकांची गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. एनआयएने या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक केलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. न्यायालयात एनआयएने महत्त्वाची माहिती दिली असून ज्या बैठकीत मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयात मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात माहिती दिली. एका बैठकीत मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. सचिन वाझेही त्या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर त्या बैठकीत विनायक शिंदेही सहभागी झालेला होता. सचिन वाझेंनी हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीशी संपर्क करण्यासाठी मोबाईलचा वापरही केला होता. यावेळी एनआयएने कट रचणाऱ्या आरोपीच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण, तपास यंत्रणा हत्येमागील कटाचा आणि त्याच्या उद्देशाच्या खूप जवळ पोहचली असल्याचे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. एनआयएच्या युक्तीवादानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर. सीत्रे यांनी आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या एनआयए कोठडीचा कालावधी ७ एप्रिलपर्यंत वाढवून दिला.

त्याचबरोबर एनआयएने न्यायालयात मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता? या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचे सांगितले. आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे यावेळी शिंदेचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणात सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला जबाबदार ठरवले गेलेले नसल्याचे जैन म्हणाले. नऊ दिवसांपासून शिदे तपास यंत्रणेच्या कोठडीत असून, आणखी कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तीवादही जैन यांनी केला. दुसरीकडे नरेश गोर यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड पुरवण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनी न्यायालयात सांगितले. सुनावणी अंती न्यायालयाने दोघांच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.