इशरत जहां एनकाउंटर प्रकरणातील क्राइम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका


अहमदाबाद – सीबीआय न्यायालयाने गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी क्राइम ब्रांचचे तीन अधिकारी गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, इशरत जहां, लश्कर-ए-तैयबाची दहशतवादी असल्याच्या गुप्त रिपोर्टला नाकारता येत नसल्यामुळेच या तीन अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

गुजरात सरकारने 2004 नंतर आयपीएस अधिकारी जीएल सिंघल, रिटायर्ड डीएसपी तरुण बारोट आणि असिस्टेंट सब-इंस्पेक्टर अंजू चौधरी यांच्या विरोधात इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी कारवाई करण्यास नकार दिला होता. या प्रकरणी दाखल अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी म्हटले की, इशरत जहां दहशतवादी असल्याचे पुरावे आहेत. त्या तीन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले.

अहमदाबादमधील कोतरपुर वॉटरवर्क्सजवळ 15 जून, 2004 ला पोलिस एनकाउंटरमध्ये इशरत जहां, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर ठार झाले होते. गुप्त माहितीनुसार, हे सर्वजण लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आले होते. या एनकाउंटरनंतर इशरत जहांची आई समीमा कौसर आणि जावेदचे वडील गोपीनाथ पिल्लईने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती. या प्रकरणी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली होती.