कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यानंतर इम्तियाज जलील म्हणतात; कायद्यानूसार माझ्यावर कारवाई करा


औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला असून याबद्दलची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. इम्तियाज जलील यांना यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. कोरोनाचा विसर इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पडला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यावर सर्व स्तरावरुन टीका करण्यात आली. यानंतर इम्तियाज जलील यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे.

इम्तियाज जलील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, होय, माझ्याकडून चूक झाली. माझ्यावर कायद्यानुसार जरुर कारवाई करा. जो कायदा सर्वसामान्यांना आहे, त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. पण, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.