कोरोनासंदर्भात केंद्राचा इशारा : गंभीर होत आहे परिस्थिती, संपूर्ण देश संकटात


नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत सर्व राज्यांना इशारा दिला आहे. मंगळवारी केंद्राने सांगितले की दिवसेंदिवस देशातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. विशेषत: ही काही राज्यांमध्ये एक मोठी समस्या होत आहे. सरकारने सांगितले की संपूर्ण देश हा धोक्यात असल्यामुळे कोणीही दुर्लक्ष करू नये.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 पैकी 8 जिल्हे महाराष्ट्रातील असून या यादीमध्ये दिल्लीचा जिल्हा म्हणून समावेश असल्याचे सरकारने म्हटले आहे. याबाबत माहिती देताना आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, पुणे (59,475), मुंबई (46,248), नागपूर (45,322), ठाणे (35,264), नाशिक (26,553), औरंगाबाद (21,282), बंगळुरु नगरीय (16,259), नांदेड (15,171), दिल्ली (8,032) आणि अहमदनगर (7,952) चा समावेश आहे. तांत्रिकदृष्या दिल्लीमध्ये अनेक जिल्हे आहेत, पण याला एका जिल्ह्याच्या रुपात घेतले आहे.

निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल म्हणाले की विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धोकादायक परिस्थितीतून आपण जात आहोत. परंतु संपूर्ण देश धोक्यात आला आहे, म्हणून आपल्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करावे लागतील. रुग्णालय आणि आयसीयू संबंधित तयारी कायम ठेवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. जर गोष्टी या वेगाने वाढत गेल्या तर आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल.

बहुतेक राज्यात आयसोलेशन योग्य प्रकारे होत नाही. लोकांना घरी आयसोलेट किंवा क्वारंटाइन ठेवण्यास सांगितले जाते, परंतु त्याचे योग्यप्रकारे निरीक्षण केले जात नाही. ज्या राज्यात वेगाने कोरोना वाढत आहे, त्या हिशोबाने चाचण्या केल्या जात नाही आहेत. त्याचबरोर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कमतरता आली. तसेच कोरोना नियमांचे योग्य पालन होत नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत नवीन केसेस वाढल्या आहेत. या कालावधीत, सरासरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. तसेच काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. भारताचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर 5.65% आहे, तर या राज्यांचा यापेक्षआ जास्त आहे. महाराष्ट्रात 23..44%, पंजाबमध्ये 8.82%, छत्तीसगडमध्ये 8.24% आणि मध्य प्रदेशात7.82% दराने संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.

केंद्र सरकारने सांगितले की, कोरोना संक्रमणाच्या धोकादायक ब्रिटेन आणि ब्राझिलियन व्हॅरिएंटच्या विरोधात कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड लस प्रभावी आहे. सरकारने पुढे सांगितले की, संक्रमणाच्या दक्षिण अफ्रीकी व्हॅरिएंटविषयी रिसर्च सुरू आहे. याचा रिजल्ट लवकरच समोर येतील.