लंडन मध्ये बसून नेदरलंड मध्ये काढला टॅटू

लंडन मध्ये बसलेल्या आर्टिस्टने नेदरलंड मध्ये असलेल्या अभिनेत्रीच्या हातावर टॅटू गोंदवल्याची घटना घडली. ही किमया फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. जगातील हा पाहिला रिमोट टॅटू बनला असून तो ४८३ किमी अंतरावरून काढला गेला. त्यासाठी लंडन मधील टेक्नॉलॉजीस्ट नोयाल द्रीयू याने एक रोबो आर्म तयार केला होता. आर्टिस्ट बेस थॉमस याने हा टॅटू काढला. त्यासाठी तयार केलेल्या उपकरणाची १०० वेळा चाचणी केली गेली होती.

नेदरलंड मधील अभिनेत्री स्टीन फ्रेसेन हिच्या मनगटावर हा टॅटू काढला गेला. ‘इम्पॉसिबल टॅटू’ असे या टॅटूचे नामकरण केले गेले आहे. लॉक डाऊनच्या काळात सहा आठवड्यात हे तंत्रज्ञान विकसित केले गेले असल्याचे सांगितले जात आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आवश्यक असलेल्या बऱ्याच गोष्टी घरीच तयार करण्यात आल्या होत्या तर काही बाहेरून विकत आणल्या गेल्या होत्या.

टॅटू काढण्यासाठी मशीनला आदेश देणे आणि प्रत्यक्ष टॅटू रेखला जाणे यात अजिबात वेळ जात नव्हता. या प्रक्रियेवर तीन मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार केली गेली आहे. अर्थात त्यासाठी अनेक महिने तयारी केली गेली, त्याच्या चाचण्या झाल्या आणि चाचण्या यशस्वी झाल्यावर प्रत्यक्ष प्रयोग केला गेला.