बीसीसीआयचे नवे कार्यालय दिल्लीत होणार?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड नवे कार्यालय दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम मध्ये सुरु करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बीसीसीआयचे मुख्यालय मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी दिल्लीतील अरुण जेटली (पूर्वीचे फिरोजशाह कोटला मैदान) स्टेडियमचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली यांची भेट घेतली आणि स्टेडियम मधील सोयी सुविधांची माहिती घेतली.

बीसीसीआयने नवे कार्यालय दिल्लीत अरुण जेटली स्टेडियम मध्ये सुरु करावे असा प्रस्ताव डीडीसीए ने बीसीसीआयला दिला होता. कार्यालयासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दाखविली होती असे सांगितले जात आहे.

अनुराग ठाकूर बीसीसीआय अध्यक्ष होते तेव्हा ते दिल्लीतील जनपथ कार्यालयातून काम पाहत असत. सी.के. खन्ना कार्यकारी अध्यक्ष होते तेव्हाही याच कार्यालयातून काम पहात असत. नंतर हे कार्यालय तेथून हलविले गेले, तेव्हापासून दिल्लीत बीसीसीआयचे कार्यालय नाही.