रश्मी ठाकरे खासगी रुग्णालयात दाखल, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यकारी संपादक रश्मी ठाकरे यांची तब्येत मंगळवारी अधिक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रश्मी यांना नक्की कोणत्या कारणाने रुग्णालयात नेले याची माहिती मिळू शकलेली नाही मात्र त्यांना अशक्तपणा जाणवत होता यामुळे दाखल केले गेले असे सांगितले जात आहे.

रश्मी ठाकरे यांनी ११ मार्च रोजी करोना लस घेतली होती. त्यानंतर २३ मार्च रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही करोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला होता आणि या दोघांनाही मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे विलगीकरणात ठेवले गेले होते. मात्र मंगळवारी रश्मी यांची तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविले गेले आहे.

दरम्यान राज्यात करोना संकट अधिक गडद झाले असून त्यामुळे राज्यसरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मुंबई मध्ये मंगळवारी करोनाचे ४७६० नवे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २७९१८वर गेली होती. १३९ रुग्णांच्या करोना मुळे मंगळवारी मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ३,४०,४५२ सक्रीय रुग्ण आहेत.

दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त आय एस चहल यांनी आणखी १५ दिवस तरी राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही असा खुलासा केला आहे. येत्या १५ दिवसात करोना नियमांची काटेखोर अंमलबजावणी केली जाईल आणि तरीही परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊनच विचार केला जाईल असे ते म्हणाले.