तारक मेहता आणि जेठालालच्या मैत्रीत पडली फूट!


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्रांने चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिकेमधील ‘जेठालाल’ आणि ‘तारक मेहता’ यांची मैत्री सर्वश्रृत आहेत. या दोघांची मैत्री पाहून लोकांना जय आणि वीरूच्या मैत्रीची आठवण येते. पण, या दोघांच्या बाबतीत आता एक मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्तानुसार, खऱ्या आयुष्यात हे दोन्ही कलाकार म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी आणि शैलेश लोढा हे एकमेकांशी बोलत देखील नाहीत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा एक असा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये वावरणारे प्रत्येक पात्र लोकांना खरेखुरे वाटू लागले आहे. पण, एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तारक मेहता आणि जेठालाल अर्थात दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांच्या मैत्रीमध्ये काही वादामुळे फूट पडली आहे. बर्‍याच दिवसांपासून दोघांमधील संभाषण पूर्णपणे बंद आहे. हे दोघे एकत्र शूटिंग करतात, पण सेटवर एकमेकाशी अजिबात बोलत नाहीत.

त्या संकेतस्थळाच्या वृत्तानुसार या दोघांची ही मैत्री केवळ शुटिंगच्या वेळी आणि पडद्यावरच पाहायला मिळते. वास्तविक जीवनात दोघेही एकमेकांशी बोलणेही पसंत करत नाहीत. कोणत्यातरी गोष्टीवरून दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांच्यामध्ये वाद झाल्याचे कळते. त्याच वेळी, काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातील हे वाद आताचे किंवा नवे नाहीत, तर फार पूर्वीपासून हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. पण, याचे खरे कारण अद्याप कोणालाही माहिती नाही. सेटवरही हे दोघे एकमेकांपासून अंतर ठेवून वावरताना दिसतात.