…म्हणून नाईलाजाने लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, मुंबईच्या पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत


मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मलबार हिल येथील आपल्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोकांकडून नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत अशा प्रकारे झपाट्याने वाढ होत राहिल्यास शेवटचा मार्ग म्हणून नाईलाजाने लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे.

त्याचबरोबर आम्ही क्रमाक्रमाने निर्बंध कडक करत आहोत. जनतेच्या हितासाठी आदर्श कार्यप्रणाली देखील आखून देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या प्राणांचे रक्षण हिच आमची प्राथमिकता आहे. शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे नागरिकांनी कोटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मुंबईमध्ये सरकारी इस्पितळांमध्ये लसीकरण प्रभावीपणे चालू आहे अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे काहीशी चिंता आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.