कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गदर्शकतत्वे जारी


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या राज्यात आणि मुंबईत झपाट्याने वाढत असून त्यापार्श्वभूमीवर बृह्नमुंबई महानगरपालिकेने कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची उपलब्धता आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका सतर्क झाली असल्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना महानगरपालिकेने केल्या आहेत. मुंबईतकोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्ड वॉररुम तयार करण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना करण्यात आली आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. वॉर्ड वॉररुमला माहिती दिल्याशिवाय रुग्णांना बेड देता येणार नाही. सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम याठिकाणी लक्षणे नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोरोनाबाधिताला बेड देऊ नये. तसेच खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड आणि 100 टक्के आयसीयू बेड महानगरपालिका ताब्यात घेणार आहे. वॉर्ड वॉर रुममधून रुग्णालयातील बेड्सचे नियोजन करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबईत कालपर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असून दररोज 40 ते 45 हजार लोकांचे लसीकरण होत आहे. दरदिवसाला एक लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण अत्यल्प प्रमाणात होत आहे. तेथील लसीकरण वाढवण्याची गरज आहे. डोअर टु डोअर लसीकरणाची तयारी सुरु करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने डोअर टु डोअर लसीकरणाची परवानगी देताच मुंबईत मोठ्या संख्येने लसीकरण सुरु होऊ शकेल, असे मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी म्हटले आहे.