मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोनाबाधित आणि उपलब्ध बेड्सची संख्या यांचा ताळमेळ बिघडला आहे. कोरोनाबाधितांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना बेड मिळाला नाही, वॉर्ड वॉर रुमकडून फोन आला नाही, तर मला थेट फोन करा, मी बेड उपलब्ध करुन देईनच, असे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहे.
कोरोनाबाधिताला बेड मिळाला नाही, तर थेट मला फोन करा : इक्बालसिंह चहल
आगामी काही दिवसांत दररोज कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांवर जाईल. पण वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड व्यवस्थापनाची साखळी पुन्हा एकदा सक्रिय करणार असल्याचेही महापालिकी आयुक्तांनी सांगितले आहे. महापालिका आयुक्त म्हणाले की, उच्चभ्रु लोक वशिल्याचा वापर करुन परस्पर लॅबकडून कोरोना रिपोर्ट घेतात आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवतात. पण त्यामुळे बेड व्यवस्थापन साखळी तुटते. वॉर्ड वॉररुमकडून रुग्णाची दररोज चौकशी केली जाते आणि लक्षणे असल्यास तसेच कोमॉर्बिड व्यक्तींना सरकारी किंवा खाजगी रुग्णालय अशा त्यांच्या मागणीनुसार बेड उपलब्ध करुन दिला जातो.
महापालिका आयुक्त पुढे म्हणाले की, जम्बो कोविड सेंटर, खाजगी रुग्णालयातील 80% बेड पुन्हा सक्रिय करणार असून आठवड्याला टप्प्याटप्प्याने बेडची संख्या वाढवत नेण्यात येणार आहे. डॅशबोर्डवर 13 हजार बेड आहेत. येत्या आठवड्यात 20 हजार बेड उपलब्ध होतील. आयुक्त लॉकडाऊनच्या विषयावर बोलताना म्हणाले की, नाईट कर्फ्युसारखे निर्बंध आपण लावले आहेत. 15 दिवसांच्या काळात नाईट कर्फ्युचा परिणाम होतो हे बघितले जाईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. मुंबईत सध्या 3000 बेड रिकामे आहेत, तर 450 बेड खाजगी हॉस्पिटलमध्ये रिकामे आहेत. बंद केलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार आहे. 9000 बेड जम्बो कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होतील.
ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेन्टिलेटर्सची संख्या सरकारच्या नियमानुसार आहे का हे सर्व हॉस्पिटल्सनी तपासावे. पीपीई किट्स, मास्क, औषधे यांचा अॅडवान्समध्ये साठा करुन ठेवावा. फायर ऑडिट तात्काळ करावे. सर्व खासगी हॉस्पिटल्सनी एक नोडल अधिकारी नेमावा. त्यांनी दवाखान्यातील सद्यस्थितीची माहिती द्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि एपिडेमिक डिसीज अॅक्ट 1897 नुसार सर्व हॉस्पिटल्सनी व्यवस्थापन करावे, असा सूचना देण्यात आल्या आहेत.