DGCA च्या ‘या’ निर्णयामुळे 1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार


नवी दिल्ली – विमान प्रवास येत्या १ एप्रिलपासून महाग होणार आहे. विमानतळ सुरक्षा शुल्कात (ASF) वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतल्यामुळे १ एप्रिलपासून विमान प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

विमानतळ सुरक्षा शुल्कात (ASF) देशांतर्गत प्रवाशांसाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ४० रुपये दरवाढ केली आहे. विमानतळाच्या सुरक्षेसाठी विमानतळ सुरक्षा शुल्काचा (ASF) वापर केला जातो. आता एअरपोर्ट सिक्युरिटी फी म्हणून देशांतर्गत प्रवाशांना २०० रुपये द्यावे लागतील, यासाठी आधी १६० रुपये मोजावे लागत होते. तर, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागतील. हे नवे दर एक एप्रिलपासून लागू होतील.

हे शुल्क विमानाने प्रवास करणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रवाशाला द्यावे लागते. पण, २ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, ऑन ड्युटी एअरलाइन कर्मचारी किंवा एकाच तिकीटाद्वारे कनेक्टिंग फ्लाइट पकडणारे प्रवाशी अशा काहींना यात सवलत मिळते. विमानतळ सुरक्षा शुल्काचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. सप्टेंबर २०२० मध्ये एअरपोर्ट सिक्युरिटी फी १५० रुपये होती, त्यात १० रुपयांची वाढ करण्यात आली आणि शुल्क १६० रुपये झाले आणि आता हे शुल्क २०० रुपये झाले आहे. तर, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फी ४.९५ डॉलरवरुन ५.२० डॉलर करण्यात आली होती, आणि आता हे शुल्क १२ डॉलर झाले आहे.