‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाचा तब्बल 8 महिन्यांनंतर दिलासा


मुंबई : पुत्र प्राप्तीविषयी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना दिलासा मिळाला आहे. संगमनेरच्या न्यायालयात पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 अंतर्गत याचिका दाखल झाली होती. न्यायालयाचे त्यावरील कामकाज पूर्ण झाले आहे. इंदुरीकर महाराजांना न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर उपस्थित होण्यास सांगितले होते. आज इंदुरीकरांचे रिव्हीजन अपील न्यायालयाने मंजुर करत खालच्या न्यायालयाची प्रोसेस इश्यु ऑर्डर रद्द केली आहे.

इंदुरीकरांनी या विरोधात आपल्या वकीलांमार्फत जिल्हा सत्र न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्ष, अंनिस आणि इंदुरीकरांची बाजू ऐकुन घेतली. ही फिर्याद संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी दाखल केली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर न्यायालयात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना समन्सही बजावले होते.

अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत इंदुरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर २६ जून रोजी संगमनेर न्यायालयात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.