वॉशिंग्टन – गेल्या वर्षभरापासून अवघ्या जगभऱात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत नाही, तर वटवाघुळांपासून झाली. या विषाणूचा संसर्ग वटवाघुळांपासून मनुष्यापर्यंत दुसऱ्या प्राण्यांमार्फत झाला असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) काढल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चीनला जागतिक आरोग्य संघटनेने एकप्रकारे क्लिनचीट दिली असून, याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
वटवाघुळांपासूनच झाला कोरोनाचा उगम; चीनला जागतिक आरोग्य संघटनेची क्लिनचीट
वुहानच्या प्रयोगशाळेत चीनने महाभयंकर कोरोनाची निर्मिती केली आणि हा विषाणू जगभर पसरला असा अंदाज अनेक देशांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. हा विषाणू ‘चीनी व्हायरस’ असल्याचे अमेरिकेने तर वारंवार म्हटले आहे. जगातील अनेक शास्त्रज्ञांनाही हीच शंका आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेबाबत सुरुवातीपासूनच संशय होता. चीनची ‘डब्ल्यूएचओ’कडून पाठराखण होत असल्याचे आरोपही झाले आहेत. ‘डब्ल्यूएचओ’चे पथक 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात चीनमध्ये होते. वुहानला या पथकाने पहिली भेट दिली. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमध्येच आढळला होता. अद्याप आपला अहवाल ‘डब्ल्यूएचओ’ने अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. पण हा अहवाल आज असोसिएटेड प्रेसने जगापुढे आणला असून, त्यात चीनला एकाप्रकारे ‘डब्ल्यूएचओ’ने क्लिनचीट दिल्याचे दिसत आहे.
अमेरिकेने ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अहवालात ज्या पद्धतीने निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते पाहता चीनने अहवाल लिहिण्यास मदत केली असावी, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅण्टोनी बिल्कीन यांनी केली आहे. चीनने यावर अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’वर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.