छोट्या पडद्यावरील ‘डान्स दिवाने’ रियालिटी शोमधील 18 जणांना कोरोनाची लागण


महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात असतानाच दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची दररोज वाढती संख्या थांबता थांबतच नाही. पण याच दरम्यान एका प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर कोरोनामुळे प्रचंड मोठा हाहाकार माजला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, धर्मेश येलांडे हे परिक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या ‘डान्स दिवाने’ या शोच्या सीझन 3मध्ये तब्बल 18 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे.

याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सध्या सेटवरील सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसह डान्सर धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया कार्यक्रमाचे परिक्षक आहेत.

एका प्रसिद्ध संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘डान्स दिवाने’ सीझन 3च्या सेटवरील 18 क्रू मेंबर्सचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. क्रू मेंबर कोरोना संक्रमित झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, या कार्यक्रमाच्या गोरेगाव फिल्मसिटी स्थित सेटवर मोठा गोंधळ माजला आहे. या प्रकरणात, एफडब्ल्यूईसीएसचे सरचिटणीस अशोक दुबे यांनी एका अग्रगण्य वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की, जे काही घडले ते दुर्दैवी आहे. आमची प्रार्थना आहे की, ज्यांना लागण झाली आहे, ते लवकर बरे व्हावेत. कोरोनाची लागण सध्या केवळ शोच्या क्रू मेंबर्सना झाल्याचे समोर येत आहे. यात अद्याप कोणताही स्पर्धक किंवा परीक्षक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले नाही .

या शोची शूटिंग सुरु होण्याआधी त्यातील सहभागी कलाकार आणि सर्व क्रू मेम्बर्सची अगोदरच कोरोना चाचणी केली जाते, आणि म्हणूनच त्यांच्याकडे आता नवीन क्रू बोलवण्यासाठी थोडा वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. 5 एप्रिल रोजी या शोचे पुढील शूट होणार असून, त्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांची प्री-टेस्ट होणार आहे. जे कोरोना-निगेटिव्ह असतील, केवळ त्यांनाच शूटिंगची परवानगी दिली जाईल. परंतु, यानंतरही सेटवर बरीच सावधगिरी बाळगली जाईल.