आयपीएलसाठी बीसीसीआयचे नवे नियम: 90 मिनिटात संपवावा लागेल डाव


मुंबई : अनेक क्रिकेट चाहते आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची वाट बघत आहेत. आता अवघे काही दिवस आयपीएल सुरु होण्यास शिल्लक आहेत. आयपीएलच्या सामन्यांचा थरार आपल्याला येत्या 9 एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या या आगामी मोसमात काही नवे नियम बघायला मिळणार आहेत. बीसीलीआयने या स्पर्धेसाठी नवे नियम जारी केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक संघाला 90 मिनिटात आपला डाव संपवावा लागेल. तसेच बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नल हटवण्याचा निर्णयही घेतला आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमांनुसार चौथ्या अंपायरची ताकद वाढणार आहे.

सर्व आठही संघ मालकांना बीसीसीआयने एक मेल पाठवला आहे. या मेलमध्ये नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार प्रत्येक संघाने 90 मिनिटात आपला डाव संपवायला हवा. याआधी प्रत्येक डावाची 20 वी ओव्हर 90 व्या मिनिटाला सुरु करण्याचा नियम होता. पण, आता बीसीसीआयने वेळेत बदल केला आहे. नव्या नियमानुसार एका तासाला प्रत्येक संघाला सरासरी 14.11 ओव्हर टाकाव्या लागतील. पण यात टाईम-आऊटचा समावेश केला जाणार नाही. खेळासाठी 85 मिनिट तर टाईम आऊटसाठी 5 मिनिट दिले जातील

जर कोणताही संघ वेळ वाया घालवत असेल तर चौथ्या पंचाची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. अशावेळी फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार चौथ्या पंचाला देण्यात आला आहे. याशिवाय शिक्षा म्हणून ओव्हर-रेट नियम लागू करण्याचा अधिकार चौथ्या पंचाला देण्यात आला आहे.

त्याचबरोबर मैदानात असलेल्या पंचाच्या निर्णयाचा तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर काहीच फरक पडणार नसल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे. याचाच अर्थ आता मैदानावरील अंपायरला मदतीसाठी थर्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची गरज राहणार नाही. हा निर्णय अंपायरिंगच्या हितासाठी घेण्यात आला आहे, जेणेकरुन थर्ड अंपायरला निर्णय जाहीर करताना कोणतीही अडचण येऊ नये. अंपायरच्या निर्णयावरुन निर्माण होणाऱ्या वादांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आता शॉर्ट रन नियमामध्येही बीसीसीआयने बदल केला आहे. आता थर्ड अंपायर मैदानावर असलेल्या अंपायरच्या निर्णयाबाबत विचार करुन मुख्य निर्णय बदलू शकतात.