अमेरिकेच्या फायजर अन् मॉडर्ना लसी कोरोनावर 90 टक्के प्रभावी


वॉशिंग्टन – कोरोनाची दुसरी लाट जगभरात आल्याचे सांगण्यात येत असून जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव भारतातही जाणवत असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. पण याचदरम्यान आता अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना या लसीसंदर्भात चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या या संशोधन अहवालानुसार या दोन्ही लसीचा पहिला डोस चांगलाच परिणामकारक ठरला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना संक्रमण होण्याची शक्यता 80 टक्के कमी असते.

अमेरिकेतील या संशोधनानुसार फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना पॉझिटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्के कमी आहे. या लसीच्या अमेरिकेतील 4000 नागरिकांवरील वापरावरुन संशोधन करण्यात आले. या 4 हजार रुग्णांमध्ये आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्करचाही लसीकरण केलेल्या समावेश आहे. हे संशोधन यूस एस सेंटरर्स फॉर डीजीस कंट्रोल अँड प्रिवेशनने केले आहे. ही लस कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी किती प्रभावशाली आहे, हा निष्कर्ष या संशोधनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सीडीसीचे संचालक रोशल वेलेंस्की यांनी म्हटले की, लसीकरणाचा आपला प्रयत्न यशस्वी होत असल्याचे या संशोधनातून दिसून येते.

हे संशोधन 14 डिसेंबर 2020 से 13 मार्च 2021 या कालावधीत करण्यात आले. या संशोधनाचा निष्कर्ष सोमवारी जारी करण्यात आला. दोन्ही कंपन्यांनी या संशोधनासाठी क्लिनीकल ट्रायल्सच्या डेटाचाही उपयोग केला. दरम्यान, भारतात फायजर आणि मॉडर्नाच्या लसीला मान्यता मिळाली नाही. देशात सीरम इंस्टीट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे.

सुरुवातीला 3 महिने फायजरच्या व्हॅक्सिनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. फिनलँड आणि बुल्गारिया येथे या लसीचे साईड इफेक्ट समोर आले होते. ड्रग एजेंसीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर बॉग्डन किरिलोव यांनी म्हटले होते, बुल्गारियात ज्या 4 नागरिकांना लसीचे साइड इफेक्ट दिसून आले, त्यापैकी दोघांनी त्रास होत असल्याची आणि इतर दोघांनी सुस्ती व ताप येत असल्याची तक्रार केली होती. या लसीचे साईड इफेक्ट फिनलँड येथेही 5 जणांना जाणवले होते.