हसण्याइतकेच रडणेही प्रकृतीसाठी असते चांगले

माणसाने नेहमी हसतमुख असावे असे म्हटले जाते. हसण्याचे अनेक फायदे सांगितले जातात, त्यावर बरेच बोलले लिहिले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की हसण्याइतकेच रडणेही प्रकृतीसाठी चांगले असते. आता रडणे ही महिलांची मिरासदारी मानली जाते. बायका उठसुठ, कोणत्याही कारणाने, कधीही, कुठेही  रडतात अशी टीका नेहमी केली जाते तसेच पुरुषाने रडणे हे बायकीपणाचे मानले जाते. पण संशोधन असे सांगते की बायका असुदेत किंवा पुरुष दोघांसाठीही अधून मधून रडणे आरोग्यदायी असते.

रडण्याचे काय काय फायदे शरीराला मिळतात त्याची माहिती आता घेऊ या. रडण्याने मन हलके होते त्यामुळे शरीराला फायदा होतो. जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा शरीरात अनेक विषारी द्रव्ये तयार होत असतात. ही द्रव्ये वेळीच बाहेर पडली नाहीत तर शरीराचे नुकसान होते. रडण्याने अश्रूवाटे ही विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात आणि त्यामुळे तणाव कमी होतो.

चांगली झोप ही आरोग्यासाठी आवश्यक आहे. रडल्यामुळे शांत झोप लागते. मेंदू शांत होतो. लहान मुले रडली की शांत झोपतात हे आपण अनेकदा पाहतो. असाच परिणाम मोठ्या लोकांवर सुद्धा होत असतो. रडण्यामुळे स्ट्रेस पातळी घटते, चीडचीड कमी होते आणि हलके वाटते. कारण रडल्याने ऑक्सिटोसिन व इंडोर्फीन ही रसायने रिलीज होतात. ही रसायने माणसाचा मूड चांगला ठेवण्यासाठी मदत करत असतात.

प्रदूषणात वाढ झाल्याने डोळ्यांना इजा होतेच तसेच सतत इलेक्ट्रोनिक उपकरणे वापरल्याने डोळ्यांवर ताण येत असतो. रडले की प्रदूषणामुळे डोळ्यावर झालेला परिणाम संपतो आणि डोळे स्वच्छ होतात. तसेच डोळे ओलसर राहतात, डोळे ओलसर असणे हे फार आवश्यक असते. अर्थात अश्रू तीन प्रकारचे असतात. एक डोळे ओले राहण्यासाठी असणारे पाणी, दुसरे डोळ्यावर अति ताण आल्याने येणारे पाणी आणि तिसरे भावना अनावर झाल्याने येणारे पाणी. पैकी भावनांमुळे येणारे पाणी हे खरे रडणे आहे. त्यामुळे या रडण्याचा आरोग्याला फायदा होतो हे लक्षात घेतले पाहिजे.