मेहबुबा मुफ्तींना मिळणार नाही भारतीय पासपोर्ट

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचा भारतीय पासपोर्ट मिळण्यासाठी केलेला अर्ज प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने फेटाळला आहे. त्या संदर्भात कार्यालयाकडून मेहबुबा यांना पत्र लिहिले गेले असून त्यात पोलीस व्हेरीफीकेशन रिपोर्ट मध्ये मेहबुबा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह दिला गेल्याचे कारण दिले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर सीआयडीने दिलेल्या अहवालात मेहबुबा यांच्यापासून देश सुरक्षेला धोका असल्याचे कारण दिले गेले आहे.

या निर्णयाविरुद्ध मेहबुबा मुफ्ती यांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळली गेली आहे मात्र त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने निर्धारित उच्चस्तरीय फोरमवर अपील करू शकतील असे सांगितले गेले आहे. भारतीय पासपोर्ट नाकारला गेल्याच्या निर्णयावर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून, ‘माजी मुख्यमंत्री देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन पासपोर्ट नाकारला गेला आहे. याचा अर्थ जम्मू काश्मीर मधील परिस्थिती किती बिघडली आहे हे समजते’ असे ट्विट केले आहे.

केंद्राने लोकसभेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना ऑगस्ट १९ पासून त्यांच्या घरातच नजरबंद केले होते मात्र यांना सर्व सुविधा पुरविल्या गेल्या होत्या. आता त्या नजरकैदेत नाहीत.