टेनिसस्टार रॉजर फेडरर आता नव्या भूमिकेत

स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार, २० ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर आता नव्या भूमिकेतून जगासमोर येत आहे. या संदर्भात रॉजरने स्वतःच ट्विटरवर माहिती दिली आहे. रॉजर मायदेशाचा म्हणजे स्वित्झर्लंडचा पर्यटन सदिच्छा दूत म्हणून काम करणार असून त्याने स्वीस नॅशनल टुरिझम बोर्ड बरोबर त्या साठी दीर्घ मुदतीचा करार केला आहे.

स्वित्झर्लंड हे मुळातच जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असले तरी गेले वर्षभर करोना मुळे पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. पुन्हा एकदा देशात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी रॉजर प्रयत्न करणार आहे. रॉजर आणि स्वीस टुरिझम एकत्र येऊन जागतिक पातळीवर देश पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहेत. स्वीस टुरिझम विभागाचे सीईओ मार्टीन निदेगर म्हणाले या कामासाठी रॉजर फेडररची निवड अतिशय योग्य असून स्वित्झर्लंड आणि येथील निसर्गाने नेहमीच त्याच्या शानदार करियर मध्ये योगदान दिले आहे.

रॉजर म्हणतो, ‘जेव्हा जेव्हा मी टेनिस कोर्टवर पाउल  ठेवतो तेव्हा तेव्हा मी स्वित्झर्लंडचेच प्रतिनिधित्व करत असतो. जेव्हा जेव्हा माझे नाव गाजते तेव्हा आमचाच राष्ट्रध्वज माझ्या मनात असतो. गेली २२ वर्षे हे सुरु असून त्याचा मला अतिशय अभिमान आहे. देशाच्या पर्यटन मंत्रालयाशी माझे नाते जुळले आहे हे माझ्यासाठी फार आनंदाचे आहे.’