सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात नऊ मिनीटांची चर्चा


मुंबई : मनसुख हिरेन आणि अॅन्टेलिया प्रकरणातील एनआयएच्या तपासातून अनेक नव नवीन खुलासे होत आहेत. त्याच दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून असे समोर आले होते की आपली स्कार्पिओ गाडी मनसुख हिरेनने विक्रोळीमध्ये थांबवली आणि सीएसटी तो आला होता. त्यानंतर एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये त्याची आणि सचिन वाझे यांची नऊ मिनीटे चर्चा झाल्याची बाब समोर आली आहे.

नऊ मिनीटांनी या काळ्या रंगाच्या गाडीतून मनसुख हिरेन बाहेर पडतो आणि रस्त्यापलीकडे जाऊन एक टॅक्सी पकडतो आणि या परिसरातून निघून जातो. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर आली आहे. आता सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यामध्ये या गाडीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपास एनआयए करत आहे. मनसुख हिरेनने आपली स्कार्पिओ वाझेंच्या सांगण्यावरुनच विक्रोळीत थांबवली आणि त्याची चावी वाझेंना दिली का याचा तपास आता एनआयए करत आहे.

सचिन वाझे यांनी यावेळी मनसुख हिरेनला काय ऑफर दिली होती की ज्यामुळे मनसुख हिरेन असे करण्यास तयार झाला हेही एनआयए जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर मनसुख हिरेन यांने आपली स्कार्पिओ चोरीला गेल्याची खोटी तक्रार नोंदवली होती.