नवी दिल्ली : भारतीय सैन्याची ताकद राफेल लढाऊ विमानामुळे आणखी वाढली आहे. भारत राफेल विमानाचा वापर चीनवर नजर ठेवण्यासाठी करत आहे. त्याचबरोबर आणखी 10 राफेल लढाऊ विमाने लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. तीन राफेल लढाऊ विमाने येत्या 2-3 दिवसांत भारतात पोहोचतील, अशी सरकारी सूत्रांची माहिती आहे.
हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आणखी 10 राफेल विमाने
राफेल लढाऊ विमाने आणि त्यांचे ट्रेनर व्हर्जन एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात भारतात दाखल होऊ शकतात. त्याचबरोबर या 10 राफेल विमानांचे भारतात आगमन झाल्यानंतर भारतीय हवाई दलात राफेल विमानांची संख्या वाढणार आहे. भारतात आतापर्यंत 11 राफेल विमाने दाखल झाली आहेत आणि आणखी 10 विमाने आल्यानंतर भारताकडील राफेल विमानांची संख्या 21 वर जाणार आहे.
36 राफेल लढाऊ विमानांचा करार भारत आणि फ्रान्स दरम्यान झाला आहे. 59,000 कोटी रुपये या विमानांसाठी खर्च करण्यात आले आहेत. यापैकी 11 राफेल विमानंआतापर्यंत भारतात पोहोचले आहेत. ते अंबाला येथील सुवर्ण अॅरो स्क्वॉड्रॉनचा भाग आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये आता आणखी 10 राफेल विमाने तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
राफेल विमाने पश्चिम बंगालच्या हशिमारा येथे तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर बंगालमध्ये चीन भूतान ट्रायझँक्शनच्या जवळ आहे. चीन सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलच्या मदतीने भारत चीनवर नजर ठेवून आहे. अशा परिस्थितीत नवीन राफेल विमानांचीही चीनवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.