आइसलँड ज्वालामुखी पाहण्यासाठी उसळली गर्दी

आइसलँडमध्ये ८०० वर्षापूर्वी स्फोट झालेल्या ज्वालामुखीचा पुन्हा एकदा १९ मार्चला उद्रेक झाल्यापासून या भागात पर्यटकांची एकच गर्दी झाली आहे. ज्वालामुखीच्या मुखाजवळ जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनाच्या रांगा लागल्याचे दृश्य दिसत आहेच पण उकळत्या लाव्हाजवळ जाऊन अनेक जण फोटो शूट करत आहेत, सायकलिंग स्टंट करत आहेत असेही दिसते आहे.

१९ मार्चला या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यापासून आत्तापर्यंत ५० हजाराहून अधिक पर्यटक येथे आले आहेत. रस्त्यावर चार चार किमी लांब रांगा लागल्या आहेत. पर्यटकांची वाढती संख्या पाहून सुरक्षा रक्षक तैनात केले गेले आहेत. देशात काही आठवड्यात हजारो भूकंप झाले आहेत. ज्वालामुखी रहिवासी भागापासून दूर असल्याने मनुष्यहानी झालेली नाही. तरीही नागरिकांनी घराच्या खिडक्या बंद ठेवाव्यात आणि घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जात आहे. उद्रेकामुळे हवेत विषारी वायूचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सुरक्षेसाठी लोकांनी घरातच थांबावे असे आवाहन केले जात आहे.