यंदा बाजारात कोविड १९ फ्री पिचकारीची धूम

कारोनाचा प्रकोप वाढत चालल्याने अनेक राज्यांनी होळी रंग खेळण्यावर बंधने घातली असली तरी उत्तरप्रदेशात होळीचा उत्साह प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. या वर्षी बाजारात कोविड १९ फ्री, राफेल गन, मोदी या पिचकाऱ्यांची जादू आहे. विशेष म्हणजे यंदा चीनी पिचकाऱ्यांना ग्राहकांकडून मागणी नाही. त्यामुळे स्वदेशी पिचकाऱ्यांनी चीनी पिचकाऱ्यांना चांगलीच टक्कर देऊन बाजारावर वर्चस्व मिळविल्याचे दिसून येत आहे.

संगमनगरी प्रयागराज, बरेली येथील बाजारात अनोख्या पिचकाऱ्या आणि रंग उपलब्ध केले गेले आहेत. आत्मनिर्भर भारताची झलक त्यातून पाहायला मिळते आहे. करोनची देणगी जगाला देणाऱ्या चीनवर पाहिला हल्ला म्हणून कोविड १९ फ्री पिचकारी बाजारात आली आहे. दुकानदारांनी मेड इन इंडिया सामानाला प्राधान्य दिल्याचेही दिसून येत आहे. कोविड १९ संक्रमणापासून बचाव करणारे खास प्रकारचे रंग बाजारात आले आहेत. या रंगांमुळे चेहरा, त्वचेला नुकसान पोहोचत नाही. मोदी यांच्याबरोबरच राफेल गन आणि अनेक बॉलीवूड कलाकाराच्या नावाने पिचकाऱ्या आल्या आहेत.

फुलांच्या पाकळ्यापासून बनविलेले हर्बल रंग बाजारात आले आहेत आणि ग्राहकांकडून त्यांना मोठी मागणी आहे.