अमित शहा, शरद पवार भेटीने राज्यात तर्कवितर्काना उधाण
पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला येणे, शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खासगी विमान घेऊन अहमदाबादला जाणे आणि अमित शहांची भेट घेणे यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. उद्धव सरकार संकटात असल्याचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे पवार शहा भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो यशस्वी ठरला नाही.
महाराष्ट्रात सध्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ, सबइन्स्पेक्टर सचिन वाझे यांची अटक, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी आरोप करून १०० कोटी जमा करण्याचे पोलीस दलाला दिलेले आदेश, त्यावर आक्रमक भाजप आणि सामना मधून संजय राउत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याबाबत केलेले वादग्रस्त आरोप यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अपरात्री अहमदाबाद येथे अमित शहा यांची भेट घेतल्याच्या बातमीची भर पडली आहे.
विशेष म्हणजे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल अहमदाबादेत उद्योजक गौतम अडाणी यांच्या गेस्ट हाउस मध्ये मुक्कामास होते असेही समजते. अडाणी यांनी गेल्या आठवड्यात बारामती येथे शरद पवारांची भेट घेतली होती असेही आता सांगितले जात आहे. या भेटीबाबत दोन्ही बाजूनी मौन पाळले गेले असले तरी शहा यांनी या वृत्ताला थेट नकार दिलेला नाही. आपण नातीला भेटायला अहमदाबाद येथे आलो होतो असा खुलासा करतानाच शहा यांनी सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असेही विधान केले आहे.
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात संपादक संजय राउत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आगपाखड करताना त्यांना अॅक्सिडेंटल होम मिनिस्टर असे संबोधल्याने राष्ट्रवादीत नाराजी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना एनसीपी कोट्यातून कुणाला मंत्रीपदे द्यायची याचे सर्व अधिकार शरद पवार यांना आहेत आणि बाकीच्यांच्या त्याच्याशी संबंध नाही असे म्हटले आहे.