कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची देशवासियांशी ‘मन की बात’


नवी दिल्ली – कोरोना महामारीचे संकट देशावर पुन्हा एकदा घोंगावू लागले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर देशातील परिस्थिती सर्वसामान्य होत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात वेगाने वाढत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याच पार्श्वभूमीवर देशवासियांशी ‘मन की बात’ केली. मोदी यांनी यावेळी लॉकडाउनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींनाही उजाळा दिला.

मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनच्या आठवणींना उजाळा दिला. मोदी म्हणाले, देशाने गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचे हे अभूतपूर्व असे उदाहरण होते. येणाऱ्या पिढ्यांना या गोष्टींचा गर्व वाटेल, असे मोदी म्हणाले.

मोदी पुढे बोलताना म्हणाले, त्याचबरोबर आपण कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळे कोरोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेल्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, कोरोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकर मोहीम राबत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. योगायोग म्हणजे जेव्हा आपण मार्च महिन्यात महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदके आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली. याचदरम्यान पी.व्ही. सिंधूनेही सिल्व्हर मेडल जिंकल्याचे सांगत मोदी यांनी महिला खेळाडूंचे अभिनंदन केले.