लॉकडाऊनच्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा


मुंबई – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता अधिकच कठोरपणे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. आज या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी लॉकडाऊनच्यादृष्टीने सूचक इशारा देखील दिल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत त्यांना सूचना केली आहे की, लोक जर कोरोना संबंधित नियमांचे सातत्याने उल्लंघन करत असतील, तर लॉकडाउनसारख्या निर्बंधांसाठी तयार रहा. तसेच मुख्यमंत्री म्हणाले, मार्गदर्शक सूचनांचे गांभीर्याने लोक पालन करत नसल्यामुळे कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. म्हणून लॉकडाउन सारखी कठोर पावले विचारात घेणे आवश्यक आहे.