अशी रंगते राज्याराज्यातील होळी


होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो मात्र त्यातही प्रत्येक राज्यात या सणाची विविधता दिसते. आनंदाचा, रंगांचा हा उत्सव सर्वत्रच धुमधडाक्यात साजरा केला जातो मात्र वेगवेगळ्या नावांनी आणि वेगळ्या परंपरांनी.

महाराष्ट्राच्या कोकणात व गोव्यात हा सण शिमगा किंवा शिमगोत्सव म्हणून साजरा होतो. या सणाला घरोघरी पुरणपोळी केली जाते. सायंकाळी होळी पेटवून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो व होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड म्हणजे आदल्या होळीची राख व माती एकत्र करून ती एकमेकांच्या अंगावर उडविली जाते. रंगपंचमी दिवशी मात्र रंग खेळले जातात. गोव्यात व कोकणात या दिवशी मोठ्या मिरवणुका निघतात, नाच गाण्यांची धूम असते व दशावतरांच्या मिरवणुका काढल्या जातात.

उत्तर प्रदेशातील मथुरा, वृंदावन, नंदगांव ही सारी ब्रजभूमी म्हणजे श्रीकृष्णाची भूमी. येथील होली फारच मोठ्या प्रमाणावर साजरी होते. आठवडाभर साजर्‍या होणार्‍या या सणात लठमार होली हा वेगळा प्रकार पाहायला मिळतो. म्हणजे बायकांच्या अंगावर पुरूष रंग टाकतात व महिला त्यांना लाठीने चोपून काढतात. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक प्रवासी ही होली पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. उत्तराखंडच्या कुमाऊं भागात होळी पारंपारिक कपडे घालून व सामुहिक नाच गाणी गाऊन साजरी होते. येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत केले जाते. येथे हा सण बैठकी होली अथवा महिला होली नावाने साजरा होतो.

पंजाब मध्ये होला मोहल्ला या नावाने हा सण साजरा होतो. पवित्र आनंदपूर साहिब येथे होळीच्या दुसर्‍या दिवशी घोडेस्वारांसह हातात शस्त्रे घेतलेल्या तसेच तलवारबाजीच्या प्रदर्शनांच्या मिरवणुका काढल्या जातात. येथे सहा दिवस चालणार्‍या या उत्सवाला शिखांचे दहावे गुरू गेाविंदसिंह यांनी पौरूषाचे प्रतीक म्हणून होलीला होला मोहल्ला असे पुल्लींगी नांव दिले होते. या दिवशी साहस व पौरूष सिद्ध करणारे खेळ खेळले जातात.

बंगाल व ओडिसा मध्ये होळी डोल यात्रा किंवा डोल पूर्णिमा म्हणून साजरी केली जाते. राधाकृष्णाच्या प्रतिमा पालखीत घालून त्यांची मिरवणूक काढली जाते व त्याच्यापुढे महिला नृत्य करतात. बंगालमध्ये बसंत पर्व या नावाने रविद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये होळीची प्रथा सुरू केली तर ओरिसात जगन्नाथाची पालखीतून या दिवशी मिरवणूक काढली जाते. बिहारमध्ये या दिवशी फगुआ जोगिरा गाणी गायली जाण्याची प्रथा आहे. येथे चिखलाची होली खेळली जाते तसेच भांग पिणे आणि नृत्य हे कार्यक्रमही असतात. बिहारची कुर्ता फाड होलीही प्रसिद्ध आहे.

राजस्थानात तीन प्रकारे होली साजरी होते. माली जातीची माली होली मध्ये बायकांवर पुरूष पाणी टाकतात व बायका त्यांना लाठ्याचा प्रसाद देतात. गोदाजी गैर होली व बिकानेरची डोलची होली प्रसिद्ध आहे. हरियाणातही लठमार प्रमाणेच होली खेळली जाते मात्र येथे दीर वहिनीच्या अंगावर रंग उडवतो व वहिनी दिराला लाठीने मारण्याचा प्रयत्न करते.

Leave a Comment