देशात गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – मागील २४ तासांत देशात पुन्हा एकदा या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद झाली आहे. तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची गेल्या २४ तासांमध्ये नोंद झाली आहे. हा या वर्षातील एका दिवसात लागण होण्याचा उच्चांक आहे. देशात १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून त्याचबरोबर रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. देशात शुक्रवारी ५९ हजार ११८ रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर देशात मागील २४ तासात २९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १ लाख ६१ हजार २४० एवढी झाली आहे. तसेच ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्याच्या घडीला देशात ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. भारतात ३० जानेवारीला सर्वात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक आहे. याशिवाय देशात सर्वाधिक कोरोना फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.