माहिती अधिकार; मोदींना १९७१ साली कोणत्या कायद्याअंतर्गत अटक झाली आणि त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवले होते?


नवी दिल्ली – शुक्रवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरु झालेला बांगलादेश दौरा पाहिल्याच दिवशी मोदींनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. मोदींनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या भाषणात आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचे म्हटले. पण आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजप समर्थक आणि विरोधक असा कलगीतुऱ्याचा सामना सुरु झाला आहे. यावरुन दोन्ही बाजूचे समर्थक-विरोधक सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच मोदींच्या या वक्तव्यानंतर थेट एका काँग्रेसच्या नेत्याने भारत सरकारकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मोदींनी केलेल्या दाव्यासंदर्भातील तपशील मागवला आहे.


मोदींनी केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केल्याचे काँग्रेसचे सोशल मीडिया विभागातील नॅशनल कनव्हेअर असणाऱ्या गुजरातच्या सरल पटेल यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. ऑनलाइन अर्जाची प्रत पटेल यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे. मोदींनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्यासंदर्भातील अधिक माहिती मागवणारा आरटीआय अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे केला असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे बोलताना, मला या संदर्भात जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. मोदींना कोणत्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. कोणत्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले हे मला जाणून घ्यायचे आहे. याबाबत जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ना?, असा प्रश्न त्यांच्या फॉलोअर्सला विचारला आहे.