१८ दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या परेश रावल यांना कोरोनाची लागण


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत आहे. देशात एकीकडे लसीकरण सुरु करण्यात आले असले तरी कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करावे, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे बॉलिवूडमध्ये देखील चिंता वाढू लागली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि आमिर खान, आर माधवन तसेच मिलिंद सोमण यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता अभिनेते आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खासदार परेश रावल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती अभिनेते परेश रावल यांनी ट्विट करत स्वत: दिली आहे. माझा कोरोनाचा रिपोर्ट दूर्दैवाने पॉझिटिव्ह आला आहे. जे कुणी गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया कोरोना टेस्ट करुन घ्यावी, असे ट्विट करत परेश रावल यांनी संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे परेश रावल यांनी १८ दिवसांपूर्वीच म्हणजेच 9 मार्चला कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. यावेळी ट्विट करत त्यांनी याची माहिती चाहत्यांना दिली होती. लस घेतानाचा फोटोदेखील परेश रावल यांनी शेअर केला होता. त्याचबरोबर V फॉर व्हॅक्सीन. सर्व डाक्टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि शास्त्रज्ञांचे आभार, अशी कॅप्शन त्यांनी दिले होते. पण लस घेऊन काही दिवस उलटत नाही तर परेश रावल यांना कोरोना संसर्गाची लागण झाली.