वृद्ध जोडप्याने बनविले जगातील सर्वात मोठे कुलूप

तालानगरी म्हणजे कुलुपांचे नगर अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे नवा इतिहास रचला गेला आहे. येथे १०० वर्षाहून अधिक काळ कुलुपे बनविण्याचा व्यवसाय असलेल्या घरात सत्यप्रकाश शर्मा आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी या वृध्द जोडप्याने तब्बल ३०० किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे. हे जगातील सर्वात मोठे हाताने बनविले गेलेले कुलूप असल्याचा दावा केला जात आहे. हे कुलूप अलीगढची ओळख बनावे अशी त्यांची इच्छा आहेच पण या नंतर अयोध्येतील राम मंदिरासाठी कुलूप बनविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

अलीगढ येथे बनत असलेल्या युनिक कुलुपांसाठी प्रसिद्ध आहे. येथे बनलेली कुलुपे जगभर प्रसिद्ध आहेत. युनिक डिझाईन, सुरक्षित, मजबूत, उत्तम कारागिरी असलेली आणि भरोसेमंद अशी या कुलुपाची ख्याती आहे. सत्यप्रकाश सांगतात रॅमसंस् लॉक साठी ते कुलुपे बनविण्याचे काम करतात. लॉकडाऊन पूर्वी या अगडबंब कुलुपाची ऑर्डर मिळाली. गेले वर्षभर हे काम सुरु असून आता हे कुलूप तयार झाले आहे. त्याचे थोडे फिनिशिंग बाकी आहे. त्यानंतर या कुलुपाचे वजन साधारण ३५० किलो होईल. ६ फुट रुंद आणि २ फुट ९ इंच लांबीच्या या कुलुपाची किल्ली ३ फुट ४ इंच आहे. तिचे वजन साधारण २५ किलो आहे. सत्यप्रकाश यांच्या घरात अवजड कुलुपे बनविण्याची परंपरा आहे. त्याचे वडील भोजराज यांनी ४०-४० किलो वजनाची कुलुपे बनविली होती.