जेशोरेश्वरी शक्तीपीठ, मोदींनी केली पूजा

फोटो साभार एएनआय

बांग्लादेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी प्राचीन आणि ५२ शक्तीपीठापैकी एक असलेल्या इश्वरपूर येथील जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करत आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी केलेल्या ट्विट मध्ये मोदींनी काली पूजेची प्रतीक्षा करतोय असा उल्लेख केला होता. या निमित्ताने या मंदिराची सजावट करण्यात आली आहे.

हिंदू पुराणामध्ये दक्ष राजाची कन्या सती हिने महादेवाशी विवाह केला होता. मात्र दक्ष राजाने महादेवाचा अपमान केल्याने सतीने यज्ञात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले होते. दुःखाने व्याकुळ झालेल्या महादेवाने सतीचे शव खांद्यावर टाकून तांडव केले होते त्यावेळी सतीचे अवयव जेथे जेथे पडले ती सर्व स्थाने शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात. जेशोरेश्वरी येथे सतीच्या हाताचा पंजा पडला होता अशी मान्यता आहे.

हे मंदिर कधी आणि कुणी बांधले याचे ऐतिहासिक पुरावे मिळत नाहीत. पण एका ब्राह्मणाने हे शंभर दरवाजे असलेले मंदिर बांधले होते असे सांगितले जाते. १३ व्या शतकात लक्ष्मणसेन आणि प्रतापादित्य यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे दाखले मिळतात. मात्र पूर्वीच्या मंदिराचे काही खांब येथे अजूनही पाहायला मिळतात. १९७१च्या युद्धात हे मंदिर जीर्णावस्थेत होते आता तेथे छोटे मंदिर आहे.

मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी म्हणाले, मोदी येथे पूजा करणार याचा आम्हाला अभिमान वाटतोय आणि आनंद झाला आहे. ते शंकरभक्त आहेत आणि मा दुर्गाचे उपासक आहेत. दरवर्षी या मंदिराला हजारो भाविक भेट देतात पण मोदी येऊन गेल्याने या मंदिराची प्रसिद्धी जगभरात होईल अशी खात्री वाटते.